फाटलेला खिसा
कवी – शब्दवेडा संतोष रामकिशन राऊत फाटलेला होता केवळ खिसा, पण टाचणी लागली ती काळजाला। पैसा गेला तेव्हा वाईट वाटलं, पण माणूस गेला… तेव्हा आत्मा हलला। हसताना जी माणसं खांद्याला खांदा लावत होती, तीच माझी गरीबी पाहून नजरेला नजर टाळत होती। सुखाच्या जेवणात जे बसले होते, ते दुःखाच्या उपवासात हरवले होते। नाती होती की व्यवहार होते, हे उघड झालं… खिसा जेव्हा उसवला गेला। त्या शिवणीत माया नव्हती, फक्त गरजांची सैल गाठ होती। खिशात पैसा नसेल तर चालतं, पण मनात माणूस असायला हवा। कारण परिस्थिती बदलते, पण नात्यांचं खरं सोनं… संकटातच तेज देतं। आज फाटलेल्या खिशावर ठिगळं आहे, पण मनामध्ये नवं धैर्य फुललं आहे। जे गेले ते सौदे होते, जे राहिले… तेच खरे सोबती होते।
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
