शब्दवेड्याचा बाप
शब्दवेड्याचा बाप — शब्दवेडा संतोष राऊत मी लिहितो… मनातलं सगळं शब्दांत उतरवतो, कधी रडत, कधी हसत, कधी स्वतःलाच समजावत. तुझा चेहरा, बाबा — सतत आठवत राहतो. तू आजही फारसं बोलत नाहीस, पण तुझ्या नजरेत सगळं स्पष्ट दिसतं. मी काही न सांगताच, तू उत्तर देतोस... शांतपणे, हसत. तुझं प्रेम कधी शब्दांत नव्हतंच, ते दिसतं — जेवताना वाढलेल्या घासात, माझ्या अंगावर टाकलेल्या पांघरुणात, कधी तुझ्या फाटलेल्या चपलेत, तर कधी तुझ्या थकलेल्या नजरेत. मी शब्दवेडा, आणि तू शांततेत जगणारा. पण माझ्या प्रत्येक कवितेमागे तुझं मौन सावलीसारखं उभं राहतं. तू कधी म्हणत नाहीस "अभिमान वाटतो," पण मी जेव्हा यशाच्या जवळ जातो, तेव्हा तुझ्या डोळ्यांतलं चमकणं सगळं काही सांगून जातं. मी कवी आहे, पण तुझं मौनच माझ्या कविता घडवतं. तुझ्या न बोलण्यात जे दडलेलं असतं, तेच माझ्या प्रत्येक शब्दामागे उभं असतं. आज मी लिहितो, पण तूच तो पहिला शब्द आहेस ज्याच्याशिवाय माझी एकही कविता पुरी होत नाही. शब्दवेडा मी… पण तुझ्या अबोल प्रेमाशिवाय, माझं एकही अक्षर सावरत नाही!
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
