"ते हसतात, म्हणूनच मी तगतो..
कविता: "ते हसतात, म्हणूनच मी तगतो…" कवी – शब्दवेडा संतोष रामकिशन राऊत आई… साक्षात देव असते – पण ती मंदिरात नसते, तर माझ्या जेवणाच्या वाटीत, उशीच्या टोकावर, रोजच्या प्रार्थनेच्या मागे असते… "फक्त माझं पोर सुखात असो, बाकी काही नको मला।" वडील… बोलणं कमी, पण त्यांची खंबीर सावली मोठी, त्यांच्या थोडक्याच शब्दांत जग बदलण्याची ताकद असते – "कर पुढे वाट, मागे मी आहे!" हे त्यांच्या डोळ्यांत एकदा पाहिलं, की संपूर्ण आयुष्य पुरतं। बहीण… ती आता दुसऱ्या घरी असते, पण तिच्या आठवणीत आजही माझ्या हसण्याची जागा राखलेली असते। ती विचारते फक्त – "ठीक आहेस ना रे?" पण त्या प्रश्नात मायेचा एक ओला रुमाल बांधलेला असतो। लहान भाऊ… अजून घडतोय, शिकतोय – पण त्याचं हसणं म्हणजे माझं शांत आभाळ। मी थकलो, डगमगलो, तरी तो म्हणतो – "भाऊ, हारून नकोस… कारण तूच माझा आदर्श आहेस!" त्या एका वाक्यात तो मला परत स्वतःकडे आणतो। आणि ती… ती बायको नसून आयुष्याची कविता आहे, जिच्या नजरेत मला समजून घेणं आहे, आणि मिठीत – विसरून जाणं! मी बोलत नाही तेव्हाच ती सगळं समजते, आणि अश्रूंऐवजी मिठीत धैर्य ओतते। म्हणूनच… मी हसतो, लढतो, सहन करतो… कारण त्यांचं प्रेम माझ्या श्वासात आहे – आई, बाबा, बहीण, लहान भाऊ… आणि ती – हे पाच जणच माझं जग आहेत! ते हसतात, म्हणूनच मी तगतो…!
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
