महामानवाला करुनी वंदन
महामानवाला करुनी वंदन दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, उभा राहिला तो जनांसाठी, अंधार फोडायला दीप बनुनी, जळत राहिला तो इतरांसाठी। त्या महामानवाचे नाव उजळले, जगभर ज्याची कीर्ती पसरली, बाबासाहेब आंबेडकर म्हणून, ओळख त्यांची अमर ठरली। भूक, तिरस्कार, अन्याय सहन करत, ज्ञानाची ज्योत पेटवली, दीन-दुबळ्यांच्या अश्रूंना पुसायला, समतेची गंगा वाहवली। शिक्षण हेच शस्त्र हाती घेऊन, अज्ञानाशी युद्ध लढला, “उठा, जागे व्हा” हा संदेश देत, स्वाभिमानाचा दीप जळला। जात-पात, भेदभावाच्या भिंती, ठामपणे त्याने कोसळल्या, बंधुतेच्या त्या पवित्र धाग्यांनी, मानवतेची मने जोडल्या। भारतातील संविधान घडवून, न्यायाचा दीप प्रज्वलित केला, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा मार्ग, प्रत्येकासाठी खुला केला। हक्क, कर्तव्य यांची जाणीव देत, नवा भारत घडवून गेला, मानवतेच्या त्या पवित्र वाटेवर, सगळ्यांना चालायला शिकवला। कष्ट, संघर्ष, चिकाटी यांची, त्याने लिहिली अमर कहाणी, त्याच्या विचारांच्या तेजामध्ये, उजळली प्रत्येकाची जाणीव नवी। दुःखितांच्या डोळ्यात आशा बनून, तोच प्रकाश बनून राहिला, अंधारलेल्या या जगामध्ये, नवा सूर्य उगवून गेला। महामानवाला करुनी वंदन, कृतज्ञतेने नतमस्तक होऊ, त्याच्या आदर्शांच्या प्रकाशात, समतेचा नवा विश्व घडवू। कवी.संदीप मुलचंद पवार पालघर,उर्से
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
